Khari Khuri Kasauti Malika- Maanla Re Tula Bharat!
1 min readआजच संपलेली ऑस्ट्रेलिया-भारत मालिका ही एका रंगतदार कसोटी मालिकेचे सर्वात उत्तम उदाहरण. कसोटी किंवा इंग्रजीत “टेस्ट” असे या सामन्यांना का म्हणतात हे या मालिकेतल्या सगळ्याच सामन्यांमधून अगदी स्पष्टपणे पहायला मिळाले. आधीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्या देशातच काय, पण मायभूमीत खेळतांनाही सर्वच संघांना कायम सजग, चपळ आणि एकाग्र “ ऑन द टोज” राहावे लागते. ऑस्ट्रेलियन संघाला कुठे प्रतिस्पर्ध्याच्या तटबंदीत कुठे बारीकशी फट जरी दिसली, तरी ते त्या कच्च्या दुव्यावर नेटाने प्रहार करीत राहून तिकडे भगदाड पाडल्यावाचून राहत नाहीत. अर्थात हा ऑस्ट्रेलियन संघ २००० ते २०१५ च्या ऑस्ट्रेलियन संघाइतका बलाढ्य आणि अभेद्य नसला, तरीही कधीही हार न मानण्याची ऑस्ट्रेलियन प्रवृत्ती, आणि वेळप्रसंगी विजय मिळविण्याकरिता नियमबाह्यतेच्या सीमेवर असणारी कृत्येही करण्यास मागेपुढे न पाहण्याची बेदरकारी याही संघात पुरेपूर आहे. मैदानावर अरेरावी, स्लेजिंग आणि प्रतिस्पर्ध्याची एकाग्रता सतत बडबड करीत राहून भंग करण्याचा त्यांचा क्रम याही मालिकेत चालूच होता.

पण भारताचा संघही काही अजिंक्य वाटेल असा नव्हता. पहिल्या कसोटीत पूर्ण ताकतीनिशी उतरलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून अत्यंत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. एकट्या जोश हेझलवूड ने भारतीय फलंदाजीचा तोरा पूर्णपणे उतरवून त्यांना धूळ चारली होती. होतकरू पृथ्वी शॉ, गेल्या वर्षी आणि IPL मध्ये अत्यंत फॉर्म मध्ये असलेला मयंक, जिब्राल्टर च्या खडकासारखा असलेला पुजारा, जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहली, आणि कसोटी संघातले आपले स्थान टिकविण्याकरिता प्रयत्नांची शर्थ करणारा अजिंक्य रहाणे या सर्वांनी हेझलवूड आणि कमिन्स समोर सपशेल नांगी टाकली होती. विराट पहिल्या डावात उत्तम खेळत असतांना त्याला रहाणेच्या चुकीच्या हाकेमुळे धावचीत होऊन तंबूत परतावे लागले होते. केवळ पुजारा, कोहली, आणि रहाणे हे तिघेच काय ते ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर पहिल्या डावात उभे राहू शकले होते. बुमराह, उमेश यादव आणि अश्विनची गोलंदाजी बरी झाली होती, पण सामना जिंकण्यास सोडाच, पण बऱ्यापैकी लढत देण्यासही हा भारतीय संघ असमर्थ वाटत होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना आठ विकेट्सनी सहज खिशात टाकला, आणि मार्नस लाबुशेन हा संपूर्ण मालिकेत भारतीय गोलंदाजांना त्रास देणार हे कळून चुकले. भारताचा आघाडीचा गोलंदाज महमद शमी जायबंदी झाला, व भारताला पहिला मोठा धक्का बसला.
मेलबर्नच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाकडून कोणत्याही अपेक्षा चाहत्यांना नव्हत्या. आपले खेळाडू सामना अनिर्णीत ठेवण्यात यशस्वी झाले, किंवा जरा कमी फरकाने हरले, तरी चालेल असाच चाहत्यांचा सूर होता. शिवाय संघाचा आधारस्तंभ आणि कर्णधार कोहली पितृत्वाची सुटी घेऊन मायदेशी गेला होता. आधीच संघातले स्थान डळमळीत असलेला अजिंक्य रहाणे नेतृत्वाची धुरा सांभाळणार होता. आजवरची त्याची कप्तानपदाची कारकीर्द जरी त्याच्या नावाप्रमाणे अजिंक्य असली, तरी पहिल्या कसोटीतल्या दुसऱ्या डावात झालेली संघाची ससेहोलपट पाहता, त्याला या कसोटीत पराभवाची कटू चव चाखायला मिळणार, याबद्दल दुमत नव्हते. पण या वेळी गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी टाकत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांत गुंडाळले. लाबुशेन ने ४७ धावांची झुंजार खेळी केली. स्टीव्हन स्मिथ भोपळाही न फोडता बाद झाला. त्याला या मालिकेत सूर गवसलेला नव्हता. लेगस्लीप लावून त्याच्या लेगस्टम्पवर मारा करून त्याला बाद करण्याचा भारतीय डावपेच यशस्वी ठरत होता.
आता कसोटी होती फलंदाजांची. मयंक अगरवाल शून्यावर बाद झाला खरा, पण नंतरचा बळी मिळविण्याकरिता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना १०५ मिनिटे वात पहावी लागली. त्या अवधीत शुभमन गिल ने ओघवत्या शैलीत फलंदाजी करत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली, आणि पुजारा ने नेहमीच्या धीम्या, चिवट शैलीत ७० चेंडू खेळत १७ धावा काढल्या, आणि दोघे एकापाठोपाठ बाद झाले. ३ बाद ६४ धावसंख्या असतांना भारत ऑस्ट्रेलियाची १९५ ही तुटपुंजी धावसंख्या तरी पार करू शकेल की नाही ही शंका चाहत्यांना भेडसावू लागली. आणि मग रहाणे कर्णधाराला साजेशी खेळी खेळला. त्याने हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्याबरोबर चांगल्या भागीदाऱ्या रचत संघाला सव्वातीनशे चा पल्ला गाठून दिला. जडेजा एक अत्यंत धीरोदात्त डाव खेळला. आपल्या नेहमीच्या आक्रमक वृत्तीला लगाम घालून संघहित डोळ्यासमोर ठेवून! भारताने १३१ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलिया ने दुसऱ्या डावातही सुमार कामगिरी केली, आणि ते २०० धावांत गुंडाळले गेले. जिंकायला उण्यापुऱ्या ७० धावांचे लक्ष्य भारतासमोर होते, ते त्यांनी २ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. शुभमन गिल ने विनासायास ३६ धावा चोपल्या, आणि कर्णधाराने पुढे काही विकेट्स जाणार नाही याची खबरदारी (आणि जवाबदारीही) घेतली. पण या सामन्यात दुसऱ्या डावात उमेश यादव केवळ साडेतीन शतके टाकून जायबंदी झाला, आणि मालिकेत पुढे खेळू शकला नाही. भारताच्या गोलंदाजीला दुसरे खिंडार पडले.
सिडनीत पुढच्या कसोटीत, ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा काढल्या. नवख्या पुकोवस्कीने अर्धशतक काढले, आणि मालिकेत आत्तापर्यंत ४ डावात सूर न गवसलेल्या स्मिथने झोकदार शतक काढले. लाबुशेनचे शतक ९ धावांनी हुकले. भारताने पुन्हा एकदा फलंदाजीत सुमार कामगिरी केली. संघात पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माने जम बसला आहे असे वाटत असतांना बेजवाबदार फटका खेळून विकेट फेकली. कर्णधार रहाणे आणि पंत हे दोघेही जम बसल्यावर बाद झाले. गिल आणि पुजाराने अर्धशतके काढली, पण भारताने २४४ धावाच केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली. तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या जडेजाला चेंडू लागून त्याचे मनगटाचे हाड मोडले, आणि तो सामन्यात पुढे भाग घेऊ शकला नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सहा गड्यांच्या मोबदल्यात ३१२ धावा केल्या, आणि भारतापुढे विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य ठेवले. स्मिथ, लाबुशेन आणि ग्रीनने तडाखेबंद अर्धशतके काढली. भारताकडे ४०७ धावा करण्याकरिता दीड दिवस होता. रोहित शर्मा आणि गिलने ७० धावांची भागीदारी करत भारताला झोकात सुरुवात करून दिली, पण कमिन्सला ड्राईव्ह करण्याच्या नादात गिल बाद झाला. लगोलग, गोलंदाजी पूर्ण कह्यात आणल्यावर रोहीतही तंबूत परतला. पुजारा आणि रहाणेने चौथ्या दिवशी आणखी विकेट्स पडणार नाहीत याची दक्षता घेतली खरी, पण पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होताच राहणे बाद झाला. मग फलंदाजीला उतरला ऋषभ पंत, आणि एक तेजस्वी डाव खेळून गेला. त्याच्या सत्त्याण्णव धावांनी विजय भारताच्या आवाक्यात आला असे वाटू लागले, पण शतक अवघे तीन धावांवर आले असतांना तो बाद झाला. इतका वेळ पुजाराने एक बाजू लावून धरली होती, आणि भारत विजय मिळवू शकेल अशी आशा धुगधुगत ठेवली होती. पण हेझलवूड ने त्याची दांडी उडविल्यावर मात्र भारताचे प्राण कंठाशी आले. त्यातच, धाव घेताना हनुमा विहारीचा मांडीचा स्नायू आखडला. पुजारानंतर फलंदाजीला उतरलेल्या अश्विनला तर पाठीच्या त्रासाने इतके जर्जर केले होते, की त्याला आपल्याच बुटाचे बंद बांधणेही दुष्कर झालेले होते. पण या जायबंदी शिलेदारांच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या कोणत्याही डावपेचांना दाद दिली नाही. विहारीने जवळजवळ पावणेदोन तास, तर अश्विनने दोन तास फलंदाजी केली. मांडीचा स्नायू आखडलेल्या विहारीला फ्रंटफूट वर खेचण्याचे प्रयत्न ल्यॉन करत होता, पण विहारी बधत नव्हता. अश्विनच्या पाठीचीही “एन्ड्युरन्स टेस्ट “ ऑस्ट्रेलियन्सनी घेतली, पण अश्विन त्यांना पुरून उरला. भारताने हा सामना ज्या जिगरी खेळणे अनिर्णीत राखला, त्याने भारताचे मनोधैर्य नक्कीच उंचावले. अश्विन आणि विहारी दोघेही दुखापतीमुळे संघाबाहेर फेकले गेले, पण त्यांनी संघाला चिवटपणाचा, कधीही हार न मानण्याचा धडा घालून दिला, आणि चौथ्या कसोटीत हा गुरुमंत्र भारताच्या चांगलाच कामी आला. बुमरासुद्धा या सामन्यात जायबंदी झाला.
ब्रिस्बेनमध्ये गेल्या बत्तीस वर्षात ऑस्ट्रेलियाने पराभवाचे तोंड पहिले नव्हते. तेव्हाही त्यांना हरविण्यास वेस्ट इंडीज चा सर्वशक्तिमान संघ समोर होता. ब्रिस्बेन हा ऑस्ट्रेलियाचा अभेद्य गड होता. त्यातच, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन ने “गाब्बा ला या रे, तिकडे तुम्हाला दाखवतो!” अशी धमकी भारतीय फलंदाजांना सिडनी कसोटीदरम्यान अनेकवेळा उघड उघड दिली होती.
चौथ्या कसोटीत, पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३६९ धावा केल्या. मालिकेत दोनदा हुलकावणी देणारे कसोटी शतक अखेर लाबुशेनच्या पदरी पडले. स्मिथ, पेन, ग्रीन, आणि वेड सगळ्यांनी त्याला हातभार लावले. भारताचा मारा अगदीच नवखा होता. त्यांचा सर्वात अनुभवी गोलंदाज महमद सिराज त्याची तिसरी कसोटी खेळत होता, शार्दुल ठाकूरने एक कसोटी खेळली होती, पण त्यात जायबंदी झाल्यामुळे त्याला फार गोलंदाजी टाकण्यास मिळाली नव्हती. सुंदर आणि नटराजन यांचे हे कसोटी पदार्पण होते. खरे तर त्यांना सरावाच्या नेटमध्ये गोलंदाजी टाकण्यास ठेवलेले होते. मूळ चमूत ते नव्हते, पण खेळाडू सतत जायबंदी होत असल्याने त्यांना संधी मिळाली, व दोघांनीही त्याचे सोने केले. भारताचे पहिल्या डावात ६ गडी १८६ धावा असतांना तंबूत परतले, आणि शार्दुल ठाकूर आणि सुंदर ची जोडी जमली. सुरुवातीला सावधपणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजी खेळून काढत त्यांनी जम बसवला, आणि मग ऑस्ट्रेलियन गोलंदाजी फोडून काढली. चेंडू पुढे पडला की ड्राईव्हज आणि फ्लिक्स, आखूड असला की स्क्वेअरकट आणि पूल वापरात त्यांनी १२३ धावांची बहुमूल्य भागीदारी केली, आणि भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलिया च्या फार मागे राहणार नाही याची खबरदारी घेतली. दोघांनीही अर्धशतके काढली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दमदार खेळत, २९४ धावा काढल्या, आणि भारताला जिंकण्याकरिता ३२८ धावांचे कठीण आव्हान दिले.
चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर आटोपला, आणि भारताच्या बिनबाद ४ धावा झाल्या. पांचवा दिवस उगवला, तेव्हा हा भारताच्या क्रिकेट इतिहासातला सुवर्णदिन ठरेल असे कुणालाही वाटले नव्हते. चाहतेही, आजचा दिवस खेळून काढला, सामना अनिर्णीत ठेवला, तरी बोर्डर गावस्कर करंडक भारताकडेच राहील, या समजुतीत मश्गुल होते. रोहित शर्मा लवकर बाद झाला, आणि शुभमन गिल आणि पुजाराने शतकी भागीदारी केली. फार वेगाने धावा काढत नव्हते ते, पण सकाळच्या सत्रात भारत फार विकेट्स गमावणार नाही याची दक्षता मात्र त्यांनी घेतली. गिलचे शतक ९ धावांनी हुकले. नंतर कर्णधार रहाणेने वेगवान खेळ खेळत २२ चेंडूत २६ धावा फटकावल्या, पण त्याच नादात तो बाद झाला. आता मयंक अगरवाल फलंदाजीला येणार असे वाटत असतांना ऋषभ पंत फलंदाजीला आला, आणि भारत सामना अनिर्णीत राखण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी खेळत आहे, हे दृष्टीस पडले. पंत आणि पुजारा आपापल्या शैलीत खेळू लागले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या शरीरवेधी गोलंदाजीमुळे पुजारा चेंडू लागून काळानिळा पडत होता, तरीही त्याने आपली विकेट दिली नाही. पंतने सिडनीत अगदी तोंडाशी विजयाचा घास आणून दिला होता, पण तो बाद झाला होता. या वेळी तो अशी चूक करणार नव्हता. पण विजयासाठी बरोबर १०० धावा हव्या असतांना पुजाराचा बळी गेला, आणि भारताच्या युवाशक्ती वर जवाबदारी येऊन पडली. पंत आणि सुंदर यांच्यापैकी एक जण जपून खेळेल आणि दुसरा फटकेबाजी करेल असे “जाणकारांना” वाटत होते, पण या दोघांच्या मनात वेगळेच होते. त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर घणाघाती प्रतिहल्ला चढवला. ड्राईव्हज, कट्स, पुल्स आणि स्वीप चे फटके मारत त्यांनी भारताच्या विजयरथाची आगेकूच भरधाव चालू ठेवली. विजयासाठी १० धावा करणे शिल्लक असतांना सुंदर एक अत्यंत असुंदर फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला, आणि लगेचच शार्दुल ठाकूरचीही दांडी उडाली. पंतनेही मध्ये दोन उतावळे फटके मारले, पण तो बचावला. याआधीही त्याचा परममित्र टीम पेन ने त्याला यष्टीचीत करण्याची संधी दवडली होती. पंतने एक शैलीदार ऑफ-ड्राईव्ह चा चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले, आणि बोर्डर गावस्कर करंडक भारताकडे खेचून आणला.
हा विजय नक्कीच अत्यंत स्पृहणीय आहे. अर्ध्याहून अधिक खेळाडू जायबंदी, बुमराह, शमी, जडेजा, कोहली, अश्विन, विहारी, उमेश यादव हे बिनीचे खेळाडू नसतांनाही तुटपुंज्या “resources” चा अप्रतिम कौशल्याने वापर करत राहणे- शास्त्री या मुंबईच्या खडूस जोडगोळीने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच गल्लीत चोप दिला आहे. एकेका खेळाडूचे पाहाल, तर सगळेच क्रिकेट ने झपाटलेले गडी आहेत. कुणी वडील वाल्र्ल्यावर त्यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा गेला नाही, पण आपल्या खेळणे त्यांना आदरांजली वाहिली. कुणी वाढत्या वजनावर विजय मिळून आयत्यावेळी संघात मिलेल्या संधी चे सोने केले, कुणी शरीरभर मार खून मुरारबाजीच्या जिद्दीने किल्ला लढवत राहिला, कुणी घरच्या गरीबीशी झगडत इथवर आलेले, त्यामुळे भारताकडून खेळायला मिलेले आहे याची किंमत त्यांनी माहित होती. त्यांनी दाखवलेली लढाऊ वृत्ती असामान्य. बावनकशी सोन्यासारखे तळपून या ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्या अग्निदिव्यातून हे खेळाडू बाहेर पडलेत. उगीचच नाही, पांच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांना “कसोटी” सामने म्हणत!